Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीलोकप्रतिनिधी निवडताना शहाणपणाने मत प्रयोग केला पाहिजे. __ बी. बी. मेश्राम

लोकप्रतिनिधी निवडताना शहाणपणाने मत प्रयोग केला पाहिजे. __ बी. बी. मेश्राम

लोकप्रतिनिधी निवडताना शहाणपणाने मत प्रयोग केला पाहिजे. __ बी. बी. मेश्राम

छत्रपती संभाजी नगर (प्रति ): 

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग संघाच्या संयुक्त विद्यमाने “मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघात ही आहे.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त सदरील ऐतिहासिक, प्रासंगिक विषयावर १६४ वी शतकोत्तर मोफत वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संस्थेचे कार्यालय, साकेत नगर, छत्रपती संभाजीनगर येथे २९ मार्च २०२६ ला संपन्न झाली. 

         फुले, शाहू, आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी. बी. मेश्राम अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला मुक्कामी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर २९ मार्च १९३६ ला ठाणे जिल्ह्यातील पालघर जवळील वेढी या गावी अस्पृश्य परिषदेचे जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अस्पृश्यांनी अधिवेशनापर्यंत पोहोचू नये म्हणून ऑटो चालक व टांगेवाल्यांनी जाणीवपूर्वक संप पुकारला होता. इतक्या कठीण परिस्थितीत बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाजाने त्या काळात आंदोलन चालविले आहे. धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की ज्या समूहातील माणसे आम्हाला माणूस समजत नाही, त्या समूहात राहण्यापेक्षा सहृदय, सामर्थ्यवान शीलसंपन्न व निस्वार्थी समाजाशी संबंध जोडला पाहिजे. करिता धर्मांतर केलेच पाहिजे. त्या काळात विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीला शिष्यवृत्ती संबंधी सहकार्य करण्यास सांगितले तेव्हा महात्मा गांधींनी जर सवलती मिळविण्यासाठीच तुम्हास हिंदू धर्मात राहायचे असेल तर तुम्ही हिंदू धर्म सोडून गेला तरी चालेल. असे स्पष्ट केले होते. जे गांधी स्वराज्य साठी एक कोटी रुपये मिळवू शकतात, त्यांना अस्पृश्य उद्धारासाठी केवळ आठ लाख रुपये मिळावेत. अशा स्थितीत अस्पृश्य उद्धार कसा होणार? करिता आपण ज्ञानवशक्ती संपादन करून खोट्या रूढीची बंधने तोडून धडाडीने स्व-उन्नतीचा मार्ग चोखाळला पाहिजे. म्हणून मते विकून नालायकांची खोगीरभरती कायदेमंडळावर केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीस जाते. करिता मत विकणे हा गुन्हा तर आहेच, शिवाय तो आत्मघातही आहे. याची जाणीव ठेवून निःस्वार्थी, निर्भीड, लायक व इमानदार लोकप्रतिनिधी निवडले पाहिजेत. तदनंतर सदरील नेतृत्वावर करडी नजर ठेवली पाहिजे. तंत्रज्ञान कितीही विकसित होत असले तरी कृत्रिम बुद्धिमत्ता माणवाला शहाणपण देऊ शकणार नाही. म्हणून लोकप्रतिनिधी निवडताना शहाणपणाने मत प्रयोग केला पाहिजे. ते आपणाला विकसित करावे लागणार आहे. याची तीव्रता जनतेच्या लक्षात यावी म्हणून जाणीव जागृतीच्या अनुषंगाने आपण सदरील विषयावर कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.     

       उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना अ‍ॅड. अविनाश थिट्टे म्हणाले की, आपण केवळ मतच विकत नाही तर त्या माध्यमातून आपले हक्क अधिकार विकत असतो. अर्थात ज्या आदर्श महापुरुषांनी आपणास हे मिळवून दिले त्यांनाच आपण नाकारत असतो, त्यांची स्वप्ने आपण विकत आहोत. करिता “असा मी जगलो” हे पुस्तक आपण वाचले पाहिजे. योग्य मार्गाने जगणाऱ्याला अनेक जण वेड्यात काढत असतात. साधा नगरसेवक वर्षभरात चार चाकी गाडी कशी विकत घेतो? याची चिकित्सा, मीमांसा झाली पाहिजे. 

       प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना समन्वयक अ‍ॅड. राजू बागुल म्हणाले की, तंत्रज्ञान युगात जाणीवपूर्वक सामूहिक मते वळविण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात नैतिकतेची पायमल्ली करून कृत्रिम बुद्धिमत्ता व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यामुळे अप्रत्यक्षपणे मानवीय अधिकाराचे हणन होते. २० मार्च १९२७ ला महाड सत्याग्रहात पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. १० डिसेंबर १९४८ ला युडीएचआर ने पाणी हा मूलभूत अधिकार असल्याचे स्वीकारलेले आहे. अशाप्रकारे मानवी अस्तित्वाला सन्मान मिळावा म्हणून मत विकू नये.   

      याप्रसंगी प्रा. शिवम गायकवाड म्हणाले की, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ याचा ताळमेळ लावून उपाययोजना आखल्या पाहिजेत. भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमान काळात चालत राहिले तर भविष्यकाळ उज्वल होऊ शकतो. आपला नागरिकांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार मिळाले असले तरी त्याचा वापर करीत असताना संबंधित पक्षाच्या जाहीरनाम्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. राजकारण हे एक व्यवसाय आहे असे समजून त्यात केलेली गुंतवणूक भ्रष्टाचाराच्या माध्यमातून नफ्यासह वसूल केली जाते. उद्योजक मिलिंद बागुल म्हणाले की, ईव्हीएम च्या माध्यमातून गठ्ठ्याने मते विकली जातात. उद्योजक शशिकांत काळे अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडले जावेत ही लोकशाहीची थट्टाच म्हणावी लागेल.   

       सुरुवातीला आदर्शांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून स्टडी फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन अ‍ॅड. विलास रामटेके आणि प्रास्ताविक इंजिनिअर किशोर पाटील यांनी तर उद्योजक मिलिंद बागुल यांनी आभार व्यक्त केले. =====

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular